स्वप्निल तांडेल करावेगांव प्रतिनिधी ऑनलाईन फसवणूक करणार्या टोळ्यांनी आता सोशल माध्यमांचा वापर करुन नातेवाईक अथवा मित्र असल्याचे भासवून समोरील व्यक्तीकडून ऑनलाईन पैसे उकळण्याचे प्रकार सुरु केले आहेत. असाच काहीसा प्रकार पनवेलच्या सुकापुर भागातील तरुणासोबत नुकताच घडला आहे. अज्ञात टोळीने या तरुणाच्या मामाच्या फोटोचा वापर करुन व्हॉट्सअॅपद्वारे त्याच्याकडून 38 हजार रुपये उकळल्याचे उघडकिस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला अभिषेक पांडे (29) हा तरुण पनवेलच्या सुकापुर भागात राहाण्यास असून त्याचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. अभिषेकचा मामा नितेश पांडे हा कर्नाटकात बंगलोर येथे कुटुंबासह राहण्यास असून त्यांच्याकडे मोबाईलचे वेगवेगळे नंबर आहेत. यातील मुख्य नंबरवर अभिषेक नियमित आपल्या मामासोबत व्हॉटसअॅपवरुन चॅटींग तसेच संपर्क साधत होता.
अभिषेकचा मामा त्याच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या नंबरवरुन अभिषेक सोबत संपर्क साधत होता. याचाच फायदा ऑनलाईन फसवणुक करणार्या टोळ्यांनी घेतला. या टोळीने अभिषेकचा मामा नितेश पांडे याच्या फोटोचा वापर करुन अभिषेकचा मामा असल्याचे भासवून अज्ञात नंबरवरुन अभिषेक सोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातुन संपर्क साधला. तसेच अभिषेकला इंग्रजीमधुन हिंदी भाषेत मित्राला हॉस्पीटलमध्ये पैशांची अर्जंट गरज असल्याचे व गुगल पेच्या माध्यमातून अर्जंट पैसे पाठविण्याबाबत मेसेज पाठविला. तसेच दुसर्या दिवशी सकाळी सदर पैसे परत करण्याबाबत देखील मेसेज पाठविला. सदर व्हॉट्अॅप नंबरवर अभिषेकचा मामा नितेश पांडे याचा फोटो असल्याने सदरचा मेसेज नितेश पांडे यानेच पाठविल्याचा समज झाल्याने अभिषेकने सदर मोबाईल नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नंबर न लागल्याने अभिषेकने त्यांना किती पैसे पाठवायचे असा मेसेज पाठविला असता, समोरुन प्रथम 18हजार रुपये व त्यांनतर 10-10 हजार रुपये अर्जंट पाठविण्यास सांगितले. त्यानुसार अभिषेकने तत्काळ समोरील व्यक्तीने पाठविलेल्या युपीआय आयडी नंबरवरुन दोन वेळा 38 हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर समोरील व्यक्तीने पुन्हा 22 हजार रुपये पाठविण्या बाबतचा मेसेज अभिषेकला पाठविला. त्यानुसार अभिषेकने पुन्हा 22 हजार रुपये ऑनलाईन पाठवून दिले.
मात्र सदरची रक्कम न गेल्याने ती रक्कम दोन दिवसानंतर अभिषेकच्या खात्यात परत आली. दरम्यान, अभिषेकने पाठविलेली रक्कम त्याच्या मामाने दुसर्या दिवशी परत न पाठविल्याने अभिषेकने आपला मामा नितेश पांडे यांच्या मुख्य नंबरवर फोन करुन आपल्या पैशांची मागणी केली. यावेळी नितेश पांडे यांनी अभिषेकला कुठल्याही प्रकारचा मेसेज पाठविला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अभिषेकने व्हॉट्अॅपवरुन त्याला मेसेज पाठविणार्या व्यक्तीला मेसेज पाठवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली असता, समोरील व्यक्तीने त्याची फसवणूक केल्याचे सांगून तो त्याला ओळखत असल्याचे तसेच त्याचे पैसे 15 दिवसात परत करणार असल्याचे त्याला मेसेजद्वारे सांगितले. त्यानंतर आपली अज्ञात व्यक्तीकडून फसवणुक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने खांदेश्वर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात फसवणुकिसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.