Categories
बीड

बीड जिल्ह्यातील वाळू माफियाविरुद्ध कडक कारवाई करा पालकमंत्र्यांचे निर्देश; पाठीशी घालणाऱ्याची गय केली जाणार नाही

हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

बीड:जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या तसेच त्यातून घडलेल्या अपघातांच्या तक्रारी गंभीर असून पोलीस व महसूल प्रशासनाने अशा वाळू माफियांविरुद्ध तातडीने कडक कार्यवाहीचे सत्र सुरू करावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलिस व महसूल प्रशासनास दिले आहेत. महसूल किंवा पोलीस खात्यातील कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार जर उघडकीस आला तर त्याची अजिबात गय केली जाणार नाही, प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्यात यावी असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यात चोरट्या मार्गांनी अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सध्या वाढताना दिसत आहेत.त्यातच गेवराई तालुक्यात एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा वाळूच्या वाहनाने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाचे कान टोचले आहेत.जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक व माफियागिरी अजिबात चालणार नाही,असे सांगताना अशा प्रकारच्या माफियागिरीवर कठोर कार्यवाही करावी तसेच यात जाणीवपूर्वक कसूर करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही करण्याचे निर्देश मुंडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत

Categories
बीड

बनावट एटीएम कार्डद्वारे शिक्षकाच्या खात्यातील ८० हजारांच्या रकमेवर डल्ला

हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

बीड: बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारण्यासाठी भामट्यांनी नवी शक्कल शोधल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. भामट्यांनी चक्क बनावट एटीएम कार्ड तयार करून शिक्षकाच्या पगारी खात्यातून ८० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अभिमान भीमराव पायाळ (रा. पंचशीलनगर, बीड) हे बीड तालुक्यातील कुर्ला येथील शाळेवर शिक्षक आहेत.त्यांचे बीडच्या एसबीआय बँकेत पगारी खाते आहे.मागील शुक्रवारी (दि.२५) सकाळी त्यांनी एटीएम कार्डद्वारे खात्यातून ११ हजार रुपये काढले.त्यानंतर दि.२८ ते ३१ दरम्यान वेळोवेळी एटीएम कार्ड वापरून त्यांच्या खात्यातून एकूण ८० हजारांची रक्कम काढून घेतल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर आहे.त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता मुंबईतील दादर आणि चेंबूर येथील एटीएम मधून सदरील रक्कम काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली.परंतु, एटीएम कार्ड बीडमध्ये स्वतःजवळ असताना मुंबईच्या एटीएम मधून रक्कम काढल्याने भामट्यांनी बनावट एटीएम कार्ड तयार करून सदरील व्यवहार झाल्याची त्यांना खात्री पटली.याप्रकरणी अभिमान पायाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यावर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरिक्षक ठोंबरे करत आहेत

Categories
गेवराई बीड

गेवराई येथे जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन काँग्रेस स्थापना दिवस साजरा

हिंदुसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

गेवराई:दि.२८.काँग्रेस पक्षाचा १३६ वा स्थापना दिवस गेवराई शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन यशराज नगर गेवराई येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे राज्य सचिव तथा सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक कडुदास कांबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रामुख्याने असंघटित कामगार काँग्रेस संघटनेचे राज्य सचिव मधुकर वारे,जिल्हा अध्यक्ष संतोष निकाळजे,महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष सोनाजी कारके,गेवराई तालुका अध्यक्ष शेषराव सदाफुले, संगीता हतागळे,शेख मुसा, महादेव रोकडे,काँग्रेस सेवा दलाचे गेवराई तालुका अध्यक्ष तुकाराम खरात,युवक काँग्रेसचे गेवराई तालुका अध्यक्ष किरण आजबकर,बळीराम गिराम, जीजा जगताप,राहुल घेणे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सोनाजी कारके यांनी केले.यावेळी युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे यांनी काँग्रेस स्थापनेचा थोडक्यात ईतिहास सांगत मोदी सरकारचे शेतकरी विरोधी ३ काळे कायदे आम्ही रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असे ठणकावून सांगितले. यावेळी उपस्थित सय्यद मन्सूर, राजु पठाण,संगीता हतागळे, वाणी अप्पा,यांनी झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मांडले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात कडुदास कांबळे यांनी काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्याच्या पुर्वी पासून ते आजपर्यंत सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करत आला आहे. त्याप्रमाणे आम्ही आपण मांडलेल्या प्रश्नावर कालबद्ध नियोजन करून गोरगरीबांना न्याय मिळवून देवू असा विश्वास जनतेसमोर व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी यशराज नगर येथील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम संपला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सामाजिक सुरक्षा समितीचे गेवराई तालुका अध्यक्ष शेषराव सदाफुले यांनी मानले.

Categories
बीड

गल्ल्यावर डल्ला मारणाऱ्या कामगाराला ठोकल्या बेड्या

पेठ बीड पोलिसांची कामगिरी; ४८ तासात गुन्ह्याचा उलगडा

हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

बीड:दि.26.बारदाना पोत्याच्या दुकानातील कामगाराने गल्ला उघडून आतील सव्वा तीन लाख रुपये लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.२४) दुपारी बीड शहरातील जुना मोंढा भागात घडली होती.पेठ बीड पोलिसांनी ४८ तासात या चोरीचा छडा लावत अहमदनगर येथे जाऊन त्या फरार कामगाराला बेड्या ठोकल्या.यावेळी त्याच्याकडून २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला.

बीडच्या जुना मोंढ्यातील बारदाना पोत्याचे व्यापारी मयूर जयनारायण काबरा यांच्या दुकानातील गल्ल्यात असलेले ३ लाख २५ हजार रुपये घेऊन दत्ता काशीद हा कामगार पसार झाला होता. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी दत्ता काशीद याच्यावर पेठ बीड ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या घटनेचा छडा लावण्याचे आदेश पेठ बीड पोलीस आणि ‘एलसीबी’ला देण्यात आले होते. दरम्यान, दत्ता काशीद अहमदनगर येथे असल्याची गुप्त माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पेठ बीड पोलिसांचे पथक अहमदनगरला गेले.सायबर सेलची मदत घेत पोलिसांनी दत्ताचा निश्चित ठावठिकाणा शोधला आणि सापळा रचून शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या.पेठ बीड ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली.पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ७४ हजार ५०० रुपये रोख आणि चोरीच्या रकमेतून खरेदी केलेला २० हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक आर.राजा,अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एलसीबीचे पोलीस निरिक्षक भास्कर राऊत यांच्या मदतीने पोलीस निरिक्षक विश्वास पाटील,पीएसआय बनकर,पोलीस कर्मचारी राहुल गुरखुदे,गणेश जगताप,सुनील आलगट. आसेफ शेख,सचिन क्षीरसागर, महेंद्र ओव्हाळ,विकी सुरवसे यांनी पार पाडली.४८ तासात मुद्देमालासह आरोपीस अटक केल्याने पेठ बीड पोलिसांचे कौतुक होत आहे.

Design a site like this with WordPress.com
Get started