
रुकडी ( दि. ११-३-२०२१ प्रशांत भोसले) वाचनामुळे आपल्यामध्ये सर्जनशीलता व परिवर्तनशीलता यांना वाव मिळतो वाचनामुळे विचार करण्याचे व विचार मांडण्याचे कौशल्य विकसित होत असते. वाचन, मनन व चिंतन यामुळे मनुष्य समृद्ध बनतो. नेहमीच दर्जेदार पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करा, दर्जेदार पुस्तके ही आपणाला प्रेरणा देण्याचे काम करतात त्यामुळे आपले जीवन बदलू शकते. केवळ वाचन करू नका तर त्या वाचनाचा आस्वाद घ्या असे मत जयवंत महाविद्यालय इचलकरंजीचे ग्रंथपाल श्री.वसंत भागवत यांनी व्यक्त्त केले. ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वाचन, लेखन व संभाषण – एक कला या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते.स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल श्री.अजितकुमार कांबळे यांनी केले.श्री.भागवत यांनी आपल्या भाषणात लेखना विषयी माहिती दिली तसेच भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उदाहरणे देऊन श्रवणीय भाषण कसे करावे याचे विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे म्हणाले वाचन, लेखन व संभाषण हे हेतू निगडीत असावे. यशस्वी कहाण्यांच्या वाचनातून आपणास संदेश मिळतो परंतु अयशस्वी कहाण्यांमधून यशाचा मार्ग सापडतो.आज वाचनासाठी विविध साहित्य आपणाला उपलब्ध आहे, त्यामुळे वाचनामध्ये कथा, कादंबऱ्या, आत्मकथा यासारखे वैविध्य असावे. आपणाला कोणत्या प्रकारचे साहित्य वाचायचे आहे हे ठरवावे लागेल आपण कोणत्या प्रकारच्या कथा, कादंबऱ्या,कवितासंग्रह किंवा आत्मचरित्र वाचणार आहोत हे निश्चित करायला पाहिजे, त्यासाठी वाचना पाठीमागील आपला हेतू निश्चित केला पाहिजे, म्हणजे आपल्या वाचनाची दिशा निश्चित होईल. आपणाला विचार करायला भाग पाडेल असे साहित्य वाचावे तसेच आत्मपरीक्षण करायला लावणारे साहित्य वाचा. लेखन या विषयावर बोलताना प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले लेखन हे प्रतिभाशक्तीवर अवलंबून असते,लेखनांवर तत्कालीन परिस्थिती व विचार करण्याची दिशा यांचा परिणाम होत असतो.स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यावर कविता लिहिल्या गेल्या तर बहुतेक तरुण विद्यार्थी प्रेम कविता लिहितात. लेखन करताना परिस्थितीचे भान असले पाहिजे. भाषण कौशल्यावर बोलताना ते म्हणाले भाषण कला विकसित करण्यासाठी चौफेर वाचन केले पाहिजे तरच तुमचा आत्मविश्वास वाढेल व तुम्ही आत्मविश्वासाने श्रोत्यांसमोर आपले विचार मांडू शकाल. या कार्यक्रमाचे आभार श्री. अमर बुल्ले यांनी मानले तर सूत्रसंचालन कु. सोनम कांबळे ( बी.ए.भाग ३ ) हिने केले. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते