
रूकडी ( दि. ७-३-२०२१ प्रशांत भोसले ) कोरोना महामारी मुळे आरोग्य व आर्थिक व्यवस्थेला फार मोठा धक्का बसला आहे, आर्थिक व्यवस्था कोलमडून गेली आहे. सध्याच्या अनिश्चितेतून बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुळे लाॕकडाऊन सारखा अपरिचित शब्द परिचयाचा झाला आहे. या कोरोनामुळे मात्र नियमितपणे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, नियमित हात धुणे,ऑनलाईन अध्यापन, ऑनलाइन पेमेंट, वर्क फ्रॉम होम अशा नवीन संकल्पना निर्माण झाल्या. कामाच्या ठिकाणी आरोग्य व सुरक्षितता याबाबत जागरूकता निर्माण झाली. उत्पादनापासून ते विक्री यामध्ये बदल झाले आहेत. ऑनलाईन खरेदीच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे घरबसल्या आपणाला आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करता येत आहेत, हे बदल कोरोणामुळे पाहावयास मिळत आहेत अशा विविध बदलांची आपणाला आता सवय करून घ्यावी लागेल असे मत शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ” बदलते व्यवस्थापन व कोविड-१९ ” या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. मुकुंद हळदकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले व्यक्त्तीला प्रत्येक वेळी प्रत्येक स्तरावर व्यवस्थापन करावे लागते, कुटुंब प्रमुखाला जसे कुटुंब चालविताना व्यवस्थापन करावे लागते त्याप्रमाणे देश पातळीवर योग्य व्यवस्थापन करावे लागते. कोणत्याही क्षेत्रात योग्य व्यवस्थापन केले नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, म्हणून कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर योग्य व्यवस्थापन करावे लागते तसेच व्यवस्थापनात सकारात्मक बाबींबरोबर नकारात्मक बाबींचाही विचार करावा लागतो म्हणजेच कोणत्याही क्षेत्रात नियोजन करताना येणाऱ्या संभाव्य अडचणी विचारात घेतल्या पाहिजेत म्हणजे त्या अडचणीवर उपाय योजना तयार ठेवता येतात, त्यामुळे पूर्वनियोजित उपक्रम पूर्ण करता येतो. जीवनामध्ये स्वयंशिस्त महत्त्वाची आहे परंतु आपण शिस्तीचे पालन करीत नाही.कोरोनाने मात्र लोकांना शिस्त शिकविली आहे. या कार्यक्रमाचे आभार बी.कॉम. भाग 3 मधील विद्यार्थीनी कु. आरती कांबळे हिने मानले तर सूत्रसंचालन बी.कॉम. भाग 3 मधील विद्यार्थीनी कु. सिमरण पेंढारी हिने केले.या कार्यक्रमास सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.