Categories
कोल्हापूर हातकणंगले

मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले :- प्राचार्य डॉ. प्रशांत नागांवकर

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलताना डाॕ.प्रशांत नागांवकर सोबत प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे डाॕ.लता मोरे व डाॕ.गिरीश मोरे

रुकडी ( दि.२७ – २ -२०२१ बातमीदार / प्रतिनिधी ) मराठी भाषेचे सौंदर्य वाढविणे आणि मराठी भाषेचे संवर्धन करणे प्रत्येक मराठी भाषिकांचे कर्तव्य आहे. आपणा सर्वांची मातृभाषा ही मराठी आहे , मातृभाषा म्हणजे आईची भाषा, आईचे महत्व इतरांना सांगण्याचे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे. मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. प्रत्येक माणसाची भाषा ही वेगवेगळी असते, आपणाला जसा मराठीचा अभिमान आहे तसा प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो हे विसरून चालणार नाही म्हणून आपण इतर भाषेचा द्वेष करू नये. आज जगातील बाहत्तर देशात मराठी भाषा बोलली जाते. देशातील अनेक विद्यापीठात मराठी भाषा अभ्यासली जाते मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री.विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले .कुसुमाग्रजांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो असे मत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कोल्हापूरचे ( केएमसी ) प्र. प्राचार्य डॉ. प्रशांत नागांवकर यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. लता मोरे यांनी केले डॉ. नागांवकर यांनी मराठी भाषेच्या उदयापासून ते आज पर्यंतच्या वाटचालीचा इतिहास मांडला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले कोणतीच बोली भाषा अशुद्ध नसते, बारा मैलावर बोलीभाषा बदलते खरेतर याच मराठी भाषेच्या छटा आहेत. प्रत्येक भाषेचा आदर केला पाहिजे, ती प्रगत झाली पाहिजे किंवा आहे ते टिकवून ठेवले पाहिजे, मात्र मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण होत आहे हे मान्य करायला पाहिजे. एखाद्या वक्त्त्याने मराठीतून व्याख्यान देताना अधून- मधून इंग्रजीचा वापर केलातर लोक त्या वक्त्त्याची वाहवा करतात परंतु एखाद्या वक्त्त्याने इंग्रजी बोलताना अधून-मधून मराठी शब्द वापरले तर मात्र लोक त्याची वाहवा करीत नाहीत, हेच मराठी भाषेला मारक आहे.मराठी भाषा ही बहुजनांची भाषा आहे, मराठीतून ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी , शिक्षक सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.आभार बी. ए.भाग एक मधील विद्यार्थीनी कु. ऋतुजा जाधव हिने मानले तर सूत्रसंचालन कु. सुयेशा नांगनुरकर ( बी.ए.भाग एक ) हिने केले

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started