Categories
कोल्हापूर हातकणंगले

योग व क्रीडा याचा योग्य समन्वय साधला तर आपण ऑलिम्पिक पदकापासून वंचित राहणार नाही – डॉक्टर कृष्णदेव गिरी

प्रशांत भोसले मिणचे ता . हातकणंगले येथील आदर्श विद्यानिकेतन अॅण्ड ज्युनियर कॉलेज , मिणचे या प्रशालेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळा मंगळवार दि .16/2/2021 रोजी संपन्न झाला.आदर्श विद्यानिकेतनच्या कॅडेटस च्या वतीने मान्यवरांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली .
डॉक्टर कृष्णदेव गिरी यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले . संभाजी हटकर यांच्या हस्ते क्रिडा ज्योतीचे पूजन करण्यात आले .तसेच अविनाश पाटील यांच्या हस्ते मैदानाची पूजन करून वार्षिक क्रीडा महोत्सव चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले . प्रशालेचा राष्ट्रीय खेळाडू सौरभ शिंदे याने खेळाडूंना खिलाडूवृत्तीसाठी शपथ दिली .
प्रशालेच्या राष्ट्रीय खेळाडूंनी ज्योत मैदानावर फिरवली . प्रशालेतील योग व मल्लखाम खेळाडुंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवत उपस्थितांची वाहवा मिळवली . उद्घाटन सोहळा जागतिक कीर्तीचे योगगुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी , राष्ट्रीय खेळाडू व रेल्वे पोलीस संभाजी हतकर , महाराष्ट्र शासन गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त अविनाश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी . एस . घुगरे सर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख शिवाजी पाटील यांनी केले .त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून वार्षिक क्रीडा महोत्सवाचे महत्व व आपल्या प्रशालेचा जिमखाना विभागाचा वार्षिक अहवाल मांडताना क्रीडा क्षेत्रातील प्रशालेची गौरव गाथा सर्वांसमोर ठेवली .
प्रशालेचे ध्येय 2028 ओलंपिक स्पर्धा असल्याचे त्यांनी नमूद करत मयुर रोकडे ,आदित्य जाधव, पार्थ खोत या खेळाडूंच्या माध्यमातून हे ध्येय गाठण्यासाठी प्रशालेचा क्रीडा विभाग कार्यरत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले . डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी आपल्या मनोगतातुन क्रीडा व योग यांचा समन्वय साधत आपण ऑलिंपिक स्पर्धेतील ते गाठू शकतो असे नमूद केले . संभाजी हतकर यांनी आपल्या मनोगतात क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्य प्राप्त प्रमाणपत्रांच्या आधारे आपण शासकीय नोकरीत सन्मानाचे पद प्राप्त करू शकतो असे विषद केले .आपल्या रांगड्या भाषेतील मनोगतातून आपण बिकट परिस्थितीतून राष्ट्रीय स्पर्धेत 41 पदक प्राप्त करत यश संपादन केल्याचे त्यांनी नमूद केले .
मी करणारच , मी करू शकतो असा आत्मविश्वास खेळाडूंच्या अंगी असावा असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला . अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉक्टर डी एस घुगरे यांनी संस्थेच्या वतीने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले . आपणही खेळाडू असून , खेळाडू हा समाजाचा एक उत्तम प्रशासक असतो असे आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा श्री एम ए परीट तसेच प्रशालेचे सर्व क्रीडा प्रशिक्षक ,शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार रणजीत पाटील यांनी मांडले .
विद्यालयातील सर्व पालकांना सदर कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण देखील करण्यात आले . 167 पालकांनी या प्रक्षेपणाचा आनंद घेत सदर कार्यक्रमाबद्दल चांगल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started