Categories
कोल्हापूर शैक्षणिक

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा ग्लोबल टीचर अवार्ड-2020 शिक्षक मच्छिंद्र कुंभार यांना मिळाला .


कोल्हापूर- सुभाष भोसले

आदर्श हायस्कूल भामटे ता. करवीर जि. कोल्हापूर या विद्यालयातील सहाय्यक शिक्षक
श्री मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांना नुकताच मानाचा 110 देशांचा सहभाग असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले.

श्री कुंभार हे गणित विषयाचे अध्यापक आहेत. त्यांनी गणित विषयांमध्ये तयार केलेली 105 ॲप्स, अनेक व्हिडिओ ई- कन्टेन्ट , गणित विषयासाठी बनविलेल्या 5000 हून अधिक कृतीपत्रिका, वर्गामध्ये राबविलेले विविध नवोपक्रम त्याचबरोबर भूमितीसारखा काठिण्य पातळीचा विषय सुलभ व्हावा यासाठी त्यांनी राबवलेल्या कृतीतून शिक्षण या नवोपक्रमांची दखल विद्या प्राधिकरण पुणे (SCERT) यांनी घेतली आहे.

त्याचबरोबर नवोपक्रमाविषयीचे त्यांचे पाच लेख आंतराष्ट्रीय जर्नल मध्ये झळकले आहेत. इयत्ता नववी व दहावीच्या गणित विषयासाठी *इंटरॅक्टिव्ह ॲनिमेटेड फ्लिपबुक ही संकल्पना राबवून एका क्यूआर कोड मध्ये संपूर्ण पाठ्यपुस्तक तयार करून शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन त्यांनी सुलभ केले आहे. गणित भाग 1 व गणित भाग 2 या दोन्ही पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला एक स्वतंत्र क्यूआर कोड तयार करून त्याचे पाठ्यपुस्तक तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः QR कोड तयार करून आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ते चिकटवलेले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन व अध्यापन या दोन्ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होण्यास मदत झाली आहे. नियमित उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहेच शिवाय जर एखादा विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी QR कोडयुक्त पाठ्यपुस्तक एक वरदान ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या या व अशा विविध शैक्षणिक कार्याची दखल घेऊन AKS फाउंडेशन, दिल्ली यांनी त्यांना मानाचा ग्लोबल टीचर-2020 हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

श्री कुंभार यांनी हे यश आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, तंत्रस्नेही मित्रांना व आपल्या गुरुवर्यांना समर्पित केले आहे.
त्यांना हे सुयश मिळण्यामागे डायटचे प्राचार्य डॉ.श्री. आय. सी. शेख , माध्यमिकचे शिक्षणाधिकारी . श्री. किरण लोहार उपशिक्षणाधिकारी श्री डी. एस. पोवार करवीरचे गटशिक्षणाधिकारी श्री. एस. के. यादव , विस्तार अधिकारी मा. श्री ओतारी , श्री. डी. सी. कुंभार व श्री विश्वास सुतार , कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री दत्ता पाटील व संघाचे सर्व पदाधिकारी व संचालक, आदर्श हायस्कूल भामटे ता करवीर जि. कोल्हापूरचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा तंत्रस्नेही टिम (TSTS) चे सर्व सन्माननीय तंत्रस्नेही शिक्षक मित्र व मुख्याध्यापक संघातील गणित-विज्ञान विषय समितीतील सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य, प्रसंगी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे सुयश मिळाले आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
ग्लोबल टीचर अवार्ड-2020 हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्री मच्छिन्द्र कुंभार यांचे कौतुक होत आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started