
इंदापूर : प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीनंतरच प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आ.अजित पवार हे इंदापूर येथे (दि. ६) रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाकरिता येणार आहेत. यावेळी तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेली जनता तसेच बेरोजगारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खाजगी सावकारी, नागरिकांचा प्रशासनावरील उडालेला विश्वास याविषयी काय बोलणार याकडे संबंध तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या तालुक्यात खाजगी सावकारकीने अक्षरशः डोके वर काढले आहे. सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने बारामतीमध्ये सावकारीला आळा घालण्यासाठी घेतलेली कठोर भूमिका तालुक्यातही घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सध्या तालुक्यात अवैध धंदे करणे हा माझा छंद आहे, ते तर मी हे केलेच पाहिजेत असे सामान्य जनतेत बोलले जाते. कोणाचा कोणावरही दबाव राहिलेला नाही. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मिळून भिमा नदीच्या पात्रात बोटीच्या सहाय्याने खुले आम रात्रंदिवस वाळू काढत आहेत, कोणी मटका, झुगार, क्लब, वेशाव्यवसाय लाॅज वरती करत आहेत, यावर अंकुश ठेवायला पाहिजे तो प्रशासकीय अधिकारी यांनी कारवाई करताच जबाबदार व्यक्तीचा फोन येतो, तो माझाच माणूस आहे, द्या सोडून, ‘ काय चाललयं इंदापूर तालुक्यात आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं’ अशी अवस्था झाली आहे.
सुरुवातीला राज्यमंत्री भरणे यांच्याविषयी जनतेमध्ये असलेली आपुलकी नष्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे. तालुक्यात पोलिस प्रशासनाकडून नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकारावर नागरिकांना उपोषणही करावे लागले. एका महिलेला तर आपल्या पोटच्या मुलावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलेचा उद्रेक राज्यमंत्र्यांच्या शर्टाच्या कॉलरपर्यंत पोहोचल्याचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. या प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना घडली. लोकप्रतिनिधीविरुद्ध सर्वसामान्य जनतेत असलेला असंतोष, त्यांना निवडून दिले असल्याची चूक जनता उघडपणे बोलून दाखवत आहेत. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याविषयी अजित पवार आपल्याच पक्षाच्या मंत्री असलेल्या भरणे यांना कोणता राजकीय डोस पाजणार याकडेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज्यमंत्री यांविषयी जशी नाराजी जनतेत आहे तशी ती त्यांच्या पक्षामध्ये ही पहायला मिळत आहे. आ.अजित पवार हे कडक शिस्तीचे नेते मानले जातात.एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील जुणे-जाणते नेते, पदाधिकारी हे विधानसभा निवडणुकीनंतर दुरावल्याचे चित्र तालुक्यात पक्षाच्या बैठकीत, कार्यक्रमात वारंवार दिसून आले आहे. तसेच तालुक्यात पक्षांतर्गत असलेले अंतर्गत बंडाळीचे दर्शनही वारंवार घडत आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांना आ. पवार कशी कान उघडणी करणार याकडेही पक्षातील निष्ठावंतांचे लक्ष लागून राहिले आहे.