
रुकडी (दि. २८ -१-२०२१ ) आपल्या मातृभाषेतून समोरच्या व्यक्तीसमोर आपले विचार मांडले तर ते अधिक प्रभावीपणे आपण मांडू शकतो. मानवी विकास व मानवी परिवर्तन होण्यासाठी मातृभाषा महत्वाची आहे. इतर भाषा आपण शिकल्या पाहिजेत याबद्दल दुमत नाही, परंतु जी आईकडून आपल्याकडे भाषा आली आहे तीच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जीवनामध्ये साधन महत्वाचे नसून साध्या महत्वाचे आहे. मराठी भाषा ही साध्या आहे तर इतर भाषा हे साधन आहे. मानवी संस्कृतीचा अभ्यास करावयाचा असेल तर प्रत्येकाला आपली मातृभाषा अवगत असली पाहिजे, मातृभाषेमुळे आपणाला आत्मविश्वास मिळतो. जीवन समृद्ध व संपन्न होण्यासाठी प्रत्येकाची मातृभाषा महत्वाची आहे, असे मत विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे मराठी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक डॉ. डी. ए. देसाई यांनी व्यक्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य
महाविद्यालय आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन
पंधरवडानिमित्त ” मातृभाषेचे जीवनातील महत्व ” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रमुख वक्ते
म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. गिरीश
मोरे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांनी ज्या महाराष्ट्रात मराठी ही मातृभाषा आहे तेथेच मराठी
भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा लागतो अशी खंत व्यक्त केली, ते पुढे म्हणाले ज्याची मातृभाषा मराठी आहे अशा प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. मातृभाषा ही मनातून व हृदयातून येत असते.विषय समजावून घेणे व इतरांशी चांगला संवाद साधण्यासाठी प्रत्येकाला मातृभाषाच उपयोगी पडते.मातृभाषेचे संवर्धन करीत असताना आपले कर्तव्य आहे असे न समजता हे माझे काम आहे या भावनेतून करावे.कारण हे माझे काम आहे असे समजून ज्यावेळी आपण काम करतो तेव्हा ते आपण मनापासून करतो.
मातृभाषेशिवाय आपण इतर भाषा चरितार्थासाठी किंवा करियरसाठी शिकत असतो महाराष्ट्र हे इतर राज्याच्या
तुलनेत आर्थिक दृष्ट्या प्रगत आहेच परंतु ते इतके प्रगत व्हावे की इतर राज्यातून महाराष्ट्रात लोक कामधंद्यानिमीत्त यावेत व त्यासाठी त्यांना मराठी भाषा शिकण्याची आवश्यकता भासली पाहिजे असे मत
प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “ मतदार जागृती शपथ उपस्थितांकडून डॉ.शंकर दळवी यांनी घेतली. आभार डॉ.लता मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन कु. सोनम कांबळे हिने केले. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात
आला. याचा लाभ शिक्षकांनी व ऑनलाइन विद्यार्थ्यांनी घेतला.
“