
पुणे दिनांक १०- (प्रतिनिधी )
सध्या संपुर्ण भारतात चिनी लोन अँपचा सुळसुळाट झाला आहे.कमी वेळात आणि झटपट कर्जाचे आमिष दाखवून या चिनी कंपन्या अक्षरशः खाजगी सावकारा प्रमाणे लूटमार करत आहे.अशा चिनी लोन अँपवर सरकारने कठोरपणे कारवाई करून त्यांच्यावर बंदी घालावी आणि त्यांच्यासाठी वसुली एजंट म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे.
या चिनी कंपन्याचा कर्जाच्या नावाखाली अक्षरशः नंगानाच सुरू आहे, भरमसाठ व्याज आकारून कर्जदारांना मेटाकुटीला आणत आहेत.यांच्या कर्जवसुलीला कुणाचेही नियंत्रण नाही.प्रोसेसिंग फीच्या नावाखाली अवाच्या सव्वा रक्कम आकारत आहे. यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने यांचे चांगलेच फावले आहे. या चिनी कंपन्याच्या कर्ज वसुलीसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या भारतीय लोकांना जरा सुद्धा आपल्या भारतीय कर्जदाराबद्दल सहानुभूती नाही, हे लोक चिनी कंपनीला कर्जवसुलीला मदत करून एकप्रकारे देशद्रोहाचा गुन्हा करत आहेत. हे वसुली एजंट कर्जदारांना अर्वाच्य भाषा, शिवीगाळ तसेच दमदाटी आणि धमकी देतात तसेच सतत वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन नातेवाईकांना फोन करून मानसिक त्रास देतात या वसुली एजंटच्या त्रासामुळे काही लोकांनी आत्महत्या पण केली आहे ,त्यामुळे सरकारने त्वरित या चिनी लोन अँपवर बंदी घालून त्यांच्या वसुली एजंट आणि कॉल सेंटरवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे अशीही मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीने केली आहे.