कोल्हापूर :
पन्हाळा प्रतिनिधी प्रदीप सुतार यांजकडून
कचरा टाकण्याच्या कारणातून उद्भवलेल्या वादातून तिघा सख्ख्या भावांनी धारदार शस्त्राने हल्ला करून आकाश आनंदा वांजळे (वय 25, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) या तरुणाचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे घडली. करवीर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकारामुळे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे तणाव निर्माण झाला आहे.
खून झालेला तरुण आणि संशयित शेजारी राहतात. त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी कचरा टाकण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला, त्यातून मध्यरात्रीनंतर त्यांच्यात हाणामारी झाली.
त्यातूनच संशयित भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे या तिघांनी आकाश वांजळे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती वांजळे यांच्या नातेवाईकांसह मित्रांना मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळासह रुग्णालयात दाखल झाले होते.