

काम होऊन महिना होत नाही तोच खडी बाहेर येऊ लागली
इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर तालुक्यातील रेडणी – बोराटवाडी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक ते दोन महिने होत नाही तोच रस्त्याची खडी बाहेर येऊ लागल्याने रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न ग्रामस्थांन पुढे उभा राहिला आहे ? सदरील रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या मार्गाने शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते त्यामुळे हा रस्ता मजबूत होणे आवश्यक होते. परंतु हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्या कारणाने महिन्या दोन महिन्यातच रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे हा रस्ता किती दिवस तघ धरणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. रस्ताचे काम करणारे ठेकेदार डांबरीकरणासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतात. कामाची कुठलेही माहिती नसताना ठेकेदार मंडळी किती वापरावे हे ठरवत असतात.त्यामुळे सातत्याने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर केले जाते. यात शासनाचा पैसा वाया जातो असे प्रकार रोखण्यासाठी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते व रेडणी - बोराटवाडी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. बराच वेळी नागरिकांनी कामाचा दर्जा लक्षात आणून दिल्यानंतरच सदरील विभागाचे अधिकारी तेथे धाव घेतात.सदरील रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना असा मनस्ताप देण्यापेक्षा सदरील प्रशासनाने अगोदरच कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. अशी देखील मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते व भटक्या विमुक्त जाती-जमाती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तानाजी धोत्रे यांनी सदरील विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.