Categories
मुंबई सातारा

सातारा येथील कुंभार कारागिरांचा सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटचा महत्वपूर्ण अभ्यास दौरा

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मोहनराव जगदाळे साहेब व प्रदेशाध्यक्ष मा. श्यामशेठ राजेसाहेब यांच्या उपस्थितीत सातारा शाखेच्या वतीने एक दिवसीय व्यावसायिक – शिक्षण सहलीचे आयोजन सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूट खानापूर (कर्नाटक) या ठिकाणी करण्यात आले. सातारा येथील कुंभार समाजाचे 100 तरुण कारागीर एकत्र येऊन राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एस टी बस करून कर्नाटक राज्यातील, बेळगाव मधील, खानापूर या ठिकाणी असणारे खादी ग्रामोद्योग संचलित सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटला भेट देऊन त्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे चालणाऱ्या मातीकामाचा अभ्यास केला. यामध्ये इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य मा. गोवर्धन साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तेथील सर्व प्राध्यापकांनी 100 कारागिरांचे प्रत्येकी 10-10 चे गट तयार करून दुपारी 12:00 ते सायंकाळी 5:30 पर्यंत संपूर्ण माती कामाचे आधुनिक स्वरूप, त्यासाठी वापरली जाणारी आधुनिक मशनरी व प्रात्यक्षिक समजावून सांगितले. यामध्ये मातीचे एखादे विशिष्ट उपकरण बनवण्यासाठी कोणत्या प्रकारची माती किती प्रमाणात घ्यावी, त्यामध्ये विविध मातींचे मिश्रण कसे तयार करावे, माती चाळून – भिजवून त्यावर पगमिल व ब्लंजर मधून परिपूर्ण मातीचा गोळा कसा तयार करावा, विविध विद्युत उपकरणावर त्या मातीला कसा आकार द्यावा, त्यामधून शोभेच्या वस्तू, स्वयंपाक घरातील भांडी, बागेतील वस्तू , अन्नधान्य साठवणुकीच्या वस्तू कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उच्च दर्जाच्या कशा बनवाव्यात हे प्रात्यक्षिकाने दाखविले. पूर्ण झालेल्या वस्तूंवर रंगकाम करून ते कसे सुशोभित करावे याचे मार्गदर्शनही ही खूप छान पद्धतीने केले. बरीच उपकरणे तरुण कारागिरांनी विविध मशीनवर तयार करूनही पाहिली. या मार्गदर्शनामध्ये इन्स्टिट्यूटचे प्राचार्य मा. प्रभाकर साहेब यांनी शेवटी समारोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. इन्स्टिट्यूटमध्ये चालणारे विविध अभ्यासक्रम, उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयीसुविधा, केंद्र सरकारच्या असणाऱ्या विविध योजना यांचीही सखोल माहिती दिली. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मोहनरावजी जगदाळे साहेब यांनी आपल्या भाषणात कुंभार कलेचा समावेश विद्यापीठामध्ये व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी करावा, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि याकडे आपण लक्ष देणार असल्याचे सांगितले. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे राज्य प्रदेशाध्यक्ष मा. श्यामशेठ राजेसाहेब यांनी खादीच्या माध्यमातून, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या प्रयत्नाने कुंभार समाजा साठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी 2700 विद्युत चाकांचे केलेले वितरण व राज्यातील तीन ठिकाणी अत्याधुनिक क्लस्टरची उभारणी केल्याची माहिती दिली. कुंभार समाजातील कारागिरांचे उत्पन्न पाचपट वाढविण्यासाठी उभ्या केलेल्या अभियानाची माहितीही मा. श्याम शेठ राजे साहेब यांनी दिली. विकास संस्थेचे कार्यकारिणीतील सदस्य श्री प्रकाश कुंभार बारामती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या भाषणामध्ये श्री प्रकाश कुंभार यांनी कुंभार समाजातील तरुण कारागिरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध योजनांची माहिती दिली. तसेच विकास संस्थेच्या सातारा कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष मा.बळवंतराव कुंभार यांनी कारागिरांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. विकास संस्थेचे तालुका अध्यक्ष मा. नितीन राजे साहेब यांनी कार्यक्रमाचे आभार मानताना जिल्ह्यातील सर्व कुंभार कारागिरांना सक्षम बनविण्यासाठी साताऱ्या मध्येही क्लस्टरची योजना राबवणार असल्याची माहिती दिली. संपूर्ण अभ्यास दौऱ्याचे नियोजन मा.नितीन राजे व मा.दिनकर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यामध्ये सातारा येथील कार्यकारिणीतील , मारुती कुंडलिक कुंभार, दत्तात्रय जगन्नाथ कुंभार, नितीन नरहरी कुंभार, रवींद्र बाळकृष्‍ण कुंभार, धनंजय दत्तात्रय कुंभार, रामदास हरी कुंभार , संपत कुंभार,चंद्रकांत शंकर कुंभार यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started