( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रा यंदा कोरोना पार्श्वभूमीवर कशापध्दतीनं होईल याची चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. प्रशासनाकडून सिद्धेश्वर यात्रा पंचकमिटीला किंवा इतर मानकरी यांना याबाबत अधिकृतपणे अद्याप कोणतीही माहिती पाठवली गेलेली नाही. मात्र प्रशासनाने यासंबंधीचा एक आराखडा तयार करून तो मंजूरीसाठी शासनाकडे सादर केला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक सण-उत्सव अगदी शेकडो वर्षाची परंपरा असलेले धार्मिकविधी कार्यक्रम मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत यावर प्रतिबंध आले आहेत. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ मंदिर बंद होती. अनेकांनी घरांमध्ये प्रार्थना केल्या. देवदेवतांचे उत्सव घराच्या उंबर्याच्या आत साजरे केले. अलीकडच्या काळात काही नियमावली घालून मंदिर प्रार्थनास्थळ सुरू करण्यात आली आहेत. उत्सव विधीनाही परवानगी देण्यात आली आहे पण बंधने आहेतच. सहा महिने मंदिर बंद होती पण नित्य नियमित पूजाविधी किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमांना बंदी नव्हती. सरकारला कोणत्याही प्रकारची बंदी लादण्यात स्वारस्य नाही. सरकारने कुठल्या धर्माला, जातीला झुकतं माप दिलं आहे असंही नाही. जीव वाचवण्यासाठी प्राधान्य दिलं आणि लॉकडाऊन किंवा संचारबंदी लावताना कठोर निर्णय घेतले. अर्थात जनतेनही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अपवादात्मक घटना वगळता सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळले. सिद्धेश्वर महायात्रेतही असंच झालं पाहिजे. जरी अनेक वर्षाची परंपरा असली तरी गर्दी होणारे सोपस्कार विधी टाळले गेलेच पाहिजेत. आमचा धर्म, आमचं मंदिर, आमची परंपरा हे सारे बोलण्यासाठी ठीक आहे. पण आपल्या या रुढी परंपरेत आपणच सहभागी होणार आणि आपलेच आरोग्य बिघडणार याची भीतीही आहेच. आवश्यक विधी करण्यास कोणतीही बंदी नाही. ठराविक लोकांच्या उपस्थितीत याला परवानगी मिळेलच. खरंतर पंचकमिटी असो किंवा पुजारी मानकरी असून या सर्वांनी यंदा धार्मिक विधीस परवानगी मागितली आहे. संपूर्ण जत्रा-यात्रा भरण्यास परवानगी मागितलेली नाही. अक्षता सोहळा आणि होमविधी सारखे कार्यक्रम ठराविक मानकरी यांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. विविध वाहिन्यांवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल अशी सुविधा करून घ्यावी. विज्ञानाने हे साध्य झालं आहे. एखाद्या वर्षी आपण एखाद्या धार्मिक विधीत सहभागी झालो नाही तर धर्म बुडत नाही. पापही लागत नाही. आपला देव आपल्या भक्तांना जाणून असतो. त्याला सध्य स्थिती ज्ञात आहे. यामुळे या विषयाला सिद्धरामेश्वराच्या भक्तांनी कोणत्याही धार्मिक अथवा राजकीय स्वरूप येणार नाही याची काळजी घ्यावी. पुढील वर्षी आपण याहीपेक्षा आनंदात, मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करू शकतो. इतर सर्वांनी आजवर नियम पाळले आहेत. आपण नियम, कायद्यापेक्षा मोठे नाही. या समाजाचेच एक भाग आहोत. परंपरा जाणीवपूर्वक कोणी खंडित करत नाही. त्यामागचे कारणही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. या मुद्द्यांचा विचार सार्वत्रिकपणे करावा. प्रशासनानेही नियमावली लादू नये. लोकांचं यानिमित्ताने प्रबोधन करावे. अनेकदा लोक कायद्याचा सन्मान करण्यासाठी तयार असतात त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कोरोना काळात घरात बसलेल्या लोकप्रतिनिधी, पुढार्यांनी आता या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी घराबाहेर पडू नये. बैठका लावणे, चर्चा घडविणे यासाठी काही पुढार्यांची लगबग सुरु आहे. हे कशासाठी हे सारेजण जाणत आहेत.